पुणे,दि २८ :- बाणेर परिसरात कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका नायजेरियन नागरिकाला पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 1 च्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाकडून 4 लाख 15 हजार 850 रुपये किमतीचे 20 ग्रॅम 160 मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ही कारावाई चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 27) केली आहे.शुएब तौफिक ओलाबी (वय-40 रा.झु व्हिलेज वाशी, नवी मुंबई मुळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी बाणेर येथील अन्नपूर्णा हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर एक नायजेरियन नागरिक कोकेन विक्री करण्यासाठी थांबला असल्याची गोपनीय माहितीपोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शुएबला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ कोकेन आढळून आले.
आरोपी विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस उप निरीक्षक सुजित सुनिल वाडेकर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे पोलीस उपनिरीक्षक डी.एल. चव्हाण करीत आहेत.
ही कारवाई पोलीस.पोलीस आयुक्त , पुणे शहर अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त ,अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे ,पोलीस उप आयुक्त ,श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर ,सहा.पोलीस आयुक्त , सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा पुणे शहर , यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस अंमलदार प्रविण शिर्के , सुजित वाडेकर , संदिप जाधव , राहुल जोशी , प्रविण उत्तेकर , नितीन जाधव , पांडुरंग पवार , संदेश काकडे यांनी केली आहे .