मुंबई, दि. ०१ :- राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक तसेच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या दि. 5 ऑगस्ट पर्यंत होणार आहेत. त्याबाबतचे संकेत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. सर्वांना विनंतीनुसारच पोस्टिंग देण्यात आले असून काही ठिकाणचे अपवाद वगळता (व्हॅकन्सी नसल्यामुळे) सर्वांनाच चॉईस पोस्टिंग देण्यात आले आहे. दरम्यान, सुमारे 200 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती लवकरच मिळणार असून त्यासाठी 3 ऑगस्ट रोजी बैठक आहे. पदोन्नतीच्या वेळी संबंधित अधिकार्यांची समवर्गप्रमाणे बदली होणार आहे. पोलिस उपनिरीक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि इतर काही दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या होणार आहेत. त्याबाबत स्वतः पोलीस महासंचालकांनी फेसबुकपेजवरून संकेत दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन असंख्य पोलिस निरीक्षक बढतीच्या प्रतिक्षेत होते. आता मात्र त्यामधील सुमारे 200 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त (पोलिस उपाधिक्षक) पदी बढती मिळणार असल्याचे निश्चीत झाले आहे. काही सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी देखील बढती मिळणार आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक यांची दि. 5 ऑगस्ट रोजीपर्यंत सर्वसाधारण बदली होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. सुमारे 200 पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळणार असल्याने अनेक ठिकाणचे अधिकारी बदलले जाणार आहेत.