पुणे,दि.२२ :-राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज दि २२ (शुक्रवारी) पुण्यात आले होते.त्यावेळी पवार यांनी पुणे शहरातील शिवाजीनगर-हिंजवडी या मेट्रो मार्गाच्या कामाबाबत माहिती दिली आहे. शिवाजीनगर-हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी काही परवानग्या मिळणे बाकी आहेत. या परवानग्या आठवडाभरात मिळतील. त्यामुळे दिवाळीनंतर या मेट्रो मार्गाचे काम सुरू केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.अजित पवार म्हणाले की, शिवाजीनगर-हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सध्या होत असलेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना आदेश दिला आहे.त्यामुळे लवकरच येथील वाहतूक सुरळीत होईल असं ते म्हणाले.विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीच येथील उड्डाणपूल तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पाडण्यात आला.पुणेकरांना किमान पुढील 50 वर्षे ही समस्या येऊ नये, म्हणून हा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.पण, आता कमीत कमी खांबाचा वापर करुन मेट्रो मार्गावरील हा पूल बांधला जाणार आहे.यामुळे तेथील वाहतूक कोंडी सुटेल आणि पुन्हा वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.दरम्यान, या मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.पुढे ते म्हणाले, सन 2006 साली हा उड्डाणपूल बांधण्यात आला.तो बांधताना अनेक त्रुटी तशाच राहून गेल्या. तर, येथून मेट्रोही जाणार आहे.या उड्डाणपूलासाठी अनेक खांब उभारल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे.त्यामुळे आता सिस्का आणि मुंबई येथील आयआयटी या दोन संस्थांचा अहवालाच्या आधारे कमीत कमी खांब बांधून येथील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. असं अजित पवार यांनी सांगितले आहे.