पुणे दि.०७ :- यंदाच्या वर्षी रौप्यमहोत्सव साजरे करीत असलेल्या कमांडर दिवाळी अंकाचे ‘ रेम्बो सर्कसचे’ आंतरराष्ट्रीय विनोदी कलाकार विजू पुष्करण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात करण्यात आले.
दरवर्षी वेगवेगळया विषयांवर प्रकाशित होत असलेल्या कमांडर या दिवाळी अंकाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या दिवाळी अंकामध्ये यावर्षी मनोरंजन हा विषय निवडण्यात आला आहे. या अंकामध्ये मानद संपादक डॉ.राजू पाटोदकर यांनी ‘ सर्कस:धाडसी मनोरंजनाचा अविष्कार’ या विषयावर लेख लिहीला आहे.याविषयाचे औचित्य साधूनच आज पुण्यातील मुंढवा येथे सुरु असलेल्या ‘ रेम्बो सर्कसचे’ आजच्या शोच्यावेळी आंतरराष्ट्रीय विनोदी कलाकार विजू पुष्करण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात करण्यात आले. यावेळी या सर्कसचे मालक सुजीत पी. दिलीप, व्यवस्थापक राजू सर आणि सर्कशीतील इतर कलाकार उपस्थित होते.आतापर्यंत कमांडरने एक वेगळा विषय घेऊन त्यावर आपले 24 अंक प्रकाशित केले आहेत. यात प्रामुख्याने चित्रपट, पर्यटन, सहकार, घरकुल, एड्स जनजागृती, गुन्हेगारी कथा, युद्ध कोरोना विरुद्ध -जनजागृती विशेषांक, विनोद विशेषांक, लोककला लोकसंस्कृती विशेषांक, राष्ट्रीय पारितोषक विजेते चित्रपट विशेषांक, अभिनेता, अभिनेत्री, खलनायक विनोदी अभिनेते,रंगभूमी अशा वैविध्यपूर्ण विषयांचा समावेश आहे.
मनोरंजन विशेषांक
यावर्षी मनोरंजन हा एक वेगळा विषय कमांडरने साकारला आहे. या मनोरंजन अंकामध्ये मनाचे रंजन केले जाते ते मनोरंजन यानुसार मनोरंजनाचे विविध पैलू वाचकांसमोर उलगडले आहेत. राज्यातील 25 मान्यवर लेखकांचे लेख या अंकात आहेत. यात प्रामुख्याने निरूपण कार कृष्णा जाधव, सुप्रसिद्ध बाल साहित्यिक प्रशांत गौतम, कुटुंब रंगलंय काव्यात चे प्रा. विसुभाऊ बापट, डॉ. व्यंकट धर्माधिकारी, ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत गाडेकर, ज्येष्ठ सिने समीक्षकद्वय दिलीप ठाकूर व धनंजय कुलकर्णी, शरद कोरडे, ज्येष्ठ कवी प्रकाश राणे, डॉ. बाबा बोराडे, डॉ. गणेश चंदनशिवे तसेच अर्चना शंभरकर, अवंतिका कानडे, जयश्री सोन्नेकर आदी लेखक व लेखिकांचे लेख ,अनुभव आहेत.