पिंपरी चिंचवड, दि.३० :- पिंपरी-चिंचवड पोलिसांना अहमदाबादचा पोलिस आयुक्त विजयसिंह बोलतोय, असे सांगून महाराष्ट्रातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना हजारो रुपयांना गंडा घालणाऱ्या तोतयाच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (ता.२९) मुसक्या आवळल्या. त्याने पिंपरीचे पोलिस आयुक्त यांचा खबरी (गुप्त बातमीदार) असल्याचे सांगत गुन्हे शाखेच्या पोलिसांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्यामुळे त्याचा हा डाव उधळला.परिणामी गेले सहा वर्षे पोलिस अधिकाऱ्यांनाच गंडा घालणारा हा भामटा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती लागला. पिंपरी चिंचवड येथे बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱी टोळी पकडून देतो, अशी बतावणी करून तो पोलिस अधिकाऱ्यांकडून दहा ते पंधरा हजार रुपये उकळत होता. खलिउल्लाह अयानुल्ला खान (वय ४२, रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) असे या तोतया पोलिस कमिशनरचे नाव आहे. मुंबईत जाऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. तत्पूर्वी, त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याच्या मागणीनुसार त्याला २४ हजार रुपये गूगल पे व पेटीएमव्दारे पिंपरी पोलिसांनी दिले होते.पैसे उकळण्यासाठी त्याने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना २५ वेळा फोन केला होता. त्यांनी तो न उचलल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलिस निरीक्षक तथा पीआय अशा अनेक अधिकाऱ्यांना फोन करून त्याने पंधरा दिवस भंडावून सोडले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय. देवेंद्र चव्हाण यांना या तोतयाचा संशय आला अन तो पोलिसांच्या तावडीत सापडला.पिंपरी-चिंचवड आय़ुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी काहीजण येणार आहेत, अशा गुप्त माहितीची व त्याने त्यांचे फोटो, त्यांच्या मोटारीचा नंबर तसेच पिस्तूलाचे फोटोही पिंपरी पोलिसांना व्हाटसअपवर दिले होते. तत्पूर्वी त्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून आयुक्तांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन नंबर अहमदाबादचा पोलिस आयुक्त असल्याची बतावणी करून घेतले होते.आयुक्तांनी फोन न घेतल्याने त्याने त्यांच्या रिडरलाही फोन केला होता. नंतर सामाजिक सुरक्षा शाखेत अनेक फोन केले. त्यांना मात्र त्याने मी तुमच्या आयुक्तांचा खबरी बोलतोय, असे सांगितले. त्यांना बेकायदेशीर हत्यार विक्रीची माहिती देऊन त्याबदल्यात १५ हजार रुपये आपल्या बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. त्यामुळे संशय येऊन पीआय चव्हाण यांनी मोबाईलवरून त्याचे लोकेशन तपासले असता ते मुंबई दिसले. त्यांचा संशय अधिक बळावला.त्यानंतर चव्हाण व टीमने थेट मुंबई गाठली. गोरेगाव येथे सापळा रचून त्याला पकडले. अशाप्रकारे मुंबईत फसवणूक केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध मालाड, गोरेगाव आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. तर, आता चिंचवडमध्ये पीआय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता.२९) आणखी एक तसाच गुन्हा दाखल झाला. प्राथमिक चौकशीत २०१५ साली पासुन आर्थिक फसवणुक करीत असल्याचे तोतया इसमाने कबुल केलेले आहे . पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आवाहन करण्यात येते की , ज्याची अशाचप्रकारे तोतया इसमाने बतावणी करुन आर्थिक फसवणुक केली असल्यास त्यांनी चिंचवड पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा . सदरची कामगिरी पोलीस आयुक्त. कृष्ण प्रकाश ,अप्पर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) काकासाहेब डोळे , सहा . पोलीस आयुक्त डॉ . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक. देवेंद्र चव्हाण , सपोनि डॉ . अशोक डोंगरे , सपोनि सागर पानमंद , प्रदिपसिंग सिसोदे , पोउपनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार मच्छिंद्र घनवट , विजय कांबळे , किशोर पढेर , संतोष बर्गे , सुनिल शिरसाट , नितीन लोंढे , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , अतुल लोखंडे , योगेश तिडके , नितेश बिच्चेवार , नागेश माळी , भगवंता मुठे , वैष्णवी गावडे , राजेश कोकाटे , सोनाली माने , अमोल साडेकर , सुमित डमाळ , अमोल शिंदे यांनी केली आहे .