कर्जत दि.११ :- ‘कोणत्याही गंभीर आजाराचं निदान आजच्या युगात एका क्लिकवर केलं जातं..विज्ञानाला सर्वस्व मानणारी आजची पिढी निसर्गावरही मात करू पाहत आहे…पण चक्क चंद्रावर झेपावण्याची स्वप्ने पाहणारी ही पिढी भोंदूगिरी,जादूटोणा,करणी यात अडकून पडते आणि ताईत,उदबत्ती अन् भानामती पावडरच्या भरवशावर आपलं नशीब अजमावते, तेंव्हा आपली डिजिटल इंडियाची संकल्पना नेमकी कुठे आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
भोंदूबाबाच्या अशा करणी-भानामतीने कर्जतच्या पोलीस यंत्रणेचेही काही काळ भान हरपले. ‘नवरा काहीच कामधंदा करत नाही त्याला बाहेरचा नाद आहे’ हे सगळं ठीक करण्यासाठी एका भोंदूबाबाने फिर्यादी व तिच्या मुलीसमोर पाट ठेऊन त्यावर गहू ठेऊन अगरबत्ती लावून स्वतः जवळची पांढरी पावडर ओवाळून ती पावडर पंधरा दिवस भाजीत टाकून नवऱ्याला खायला देण्याचा व ताईत गळ्यात बांधण्याचा सल्ला देऊन पंधरा हजार उकळले. मात्र पंधरा दिवसानंतरही नवरा आणि त्याची सवय ‘जैसे थे’च राहिल्याने अखेर फिर्यादींनी पोलीस निरीक्षक यादव यांच्याकडे धाव घेतली.जादूटोणाविरोधी असलेले सर्व कायदे धाब्यावर बसवणाऱ्या भोंदूबाबावर कर्जत पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवनाथ साहेबराव मांडगे असे या मांत्रिकाचे नाव आहे.
त्याचे झाले असे, कर्जत तालुक्यातील एक महिला यांची मुलगी पतीसह पुणे येथे राहते. महिलेचा पती काही कामधंदा करत नसल्याने व त्रास देत असल्याचे फिर्यादीने शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले.तेंव्हा तिने ओळखीच्या जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या मांत्रिकाला तिच्या घरी बोलावले. त्यानंतर फिर्यादी व तिच्या मुलीला समोर बसवुन त्यांच्या समोर पाट मांडून त्यावर गहू ठेऊन,अगरबत्ती लावून त्यावर ठेवलेला गव्हाचा एक-एक दाणा बाजूला काढून व गव्हाचे दाणे मोजून ‘बाई तुझे सर्व खरे आहे तुझा नवरा काहीही कामधंदा करत नाही, त्याला बाहेरचे नाद आहेत’असे म्हणून त्याने पांढरी पावडरची पुडी अगरबत्ती पाटासमोर ओवाळून ‘ही पुडी पंधरा दिवस नवऱ्याला भाजीतून चार,तुझा नवरा व्यवस्थित होऊन तू म्हणशील तसे तुझे ऐकेल’असे सांगितले. त्यानंतर पुडीसह तीन ताईत मुलगी व घरातील बायांच्या गळ्यात बांधण्यास सांगिलते.आणि त्यांच्याकडून १५ हजार उकळले.नंतर मला १ हजार रुपये दे असे म्हणाला.त्यानंतर काही दिवसांनी लोणी मसदपूर येथे भेट होताच तो राहिलेले हजार रु. फिर्यादीला मागत होता.त्यानंतर पंधरा दिवसांनी फिर्यादीच्या मुलीस पावडर खायला घातली का?असे विचारले असता ‘सगळी पावडर खायला घातली व ताईतही बांधले पण काहीही फरक पडला नाही’ असे तिने सांगिलते.आता आपली फसवणूक झाली आहे अशी खात्री होताच आणि पुन्हा पैसे मागत असल्याने फिर्यादीने पोलीस ठाणे गाठले व सर्व हकीगत पोलीस निरीक्षकांसमोर सांगितली. गुन्हा दाखल झाला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पांडुरंग भांडवलकर राजेश थोरात हे करत आहेत.
“कोणताही आजार आणि मनस्थिती जादूटोणा,धुपारे अंगारे अशा उपचाराने बरा होत नाही. नागरिकांनी कोणत्याही भोंदूबाबाच्या,मांत्रिकाच्या जादूटोण्याला बळी पडू नये. असा प्रकार कुठे घडत असल्यास त्वरित कर्जत पोलिसांत संपर्क साधा. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल”.
-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत