पुणे,दि.१२:- एका तरुणीला हडपसर येथील लॉजवर आणि त्यानंतर फलटण येथे येऊन तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही घटना हडपसर येथील सय्यद नगर येथे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ मे २०२४ ते ९ मे २०२४ दरम्यान घडला.
रेश्मा दीदी आणि तिचा भाऊ सोहेल शेख (दोघे रा. सय्यद नगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्याच भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी या तरुणीला चांगल्या ठिकाणी काम लावून देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर तिला हडपसर येथील लॉजवर नेले. त्यानंतर, फलटण येथील एका सोसायटीमध्ये नेऊन तिला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, तिला वेश्याव्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केला.
सोहेल शेख याने या मुलीचे कपडे काढून तिच्याशी लगट करून तिच्यावर बलात्कार करण्याचा देखील प्रयत्न केला. या तरुणीने नकार दिला असता तिला शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्यांनी आणि हाताने मारहाण करण्यात आली. त्यामुळे तिच्या गालावर, डोळ्यांच्या खाली आणि पायावर मार लागला. याप्रकरणी वानवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.