पुणे,दि.३०:- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रोड मध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सर्व प्रकारची मालवाहतूक, खासगी प्रवासी बसेस, पीएमपीएल बसेसना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. आंबेडकर चौकातून जावे लागेल.
तर, दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना एबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंजहिल्स मार्गे जावे लागेल. या बदलानुसार विद्यापीठ रस्त्याने शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना एबिल हाऊस ते सिमला ऑफिस चौक हा टप्पा पूर्णपणे बंद असेल.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो उभारण्याचे काम सुरू आहे. टाटा कंपनीकडून हे काम केले जात आहे. काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आचार्य आनंद ऋषींजी चौक (विद्यापीठ चौक), आरबीआय, कृषी महाविद्यालय, सिमला ऑफिस आणि शिवाजीनगर कोर्ट या पाच मेट्रो स्थांनकांचे काम एकाचवेळी हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
त्यासाठी ब्रेमेन चौक ते सिमला ऑफिस चौक या मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक बदल प्रस्तावित केला आहे. येत्या १ जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. यावेळी वाहतूक उपयुक्त रोहिदास पवार ही उपस्थित होते