पिंपरी चिंचवड,दि.०१:- सांगवी परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटी समोर पूर्ववैमनस्यातून दीपक दत्तात्रय कदम (रा. जुनी सांगवी) याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. ही घटना २९ मे रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास सांगवी परिसरातील माहेश्वरी चौकातील इंद्रप्रस्थ सोसायटी समोर घडली होती. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
अमन राजेंद्र गिल (वय १८ रा. नवी सांगवी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करुन सुजल राजेंद्र गिल, (वय १९ रा. नवी सांगवी), सौरभ गोकुळ घुटे, (वय २२ रा. जुनी सांगवी) यांना औंध परिसरातून शुक्रवारी (दि.31 मे) अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. दीपक कदम याचे 20 दिवसांपूर्वी आरोपी सुजल गील व अमन गील यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी मयत दीपक याने सुजल व अमन यांना धमकावले होते याचा राग अमनच्या मनात होता.
या रागातून बुधवारी रात्री नवी सांगवी मधील माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर आरोपींनी दुचाकीवरुन येऊन दीपक याच्यावर गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहर्यावर दोन गोळ्या लागल्याने त्याला उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
आरोपींचा शोध घेण्यसाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकाने गुरुवारी अमन गील याला अटक केली.
तर शुक्रवारी सुजल आणि सौरभ यांना अटक केली. अमन गील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावरही एक
गुन्हा दाखल आहे. आरोपी अमन गील याला ४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर इतर दोन आरोपींना
आज (शनिवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम, पोलीस उप निरीक्षक चक्रधर ताकभाते,
पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे, पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रकाश शिंदे, विवेक गायकवाड, विजय मोरे,
प्रमोद गोडे, विनोद साळवे, राजेंद्र शिरसाट, नितीन काळे, विनायक डोळस, पोलीस नाईक प्रवीण पाटील,
पोलीस अमलदार आकाश खंडागळे, विजय पाटील, निलेश शिंगोटे, राजाराम माने, सुहास डंगारे यांनी केली.