पुणे,दि.१४:- पुणे शहरातील कात्रज भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार मे 2024 ते 13 जून 2024 या कालावधीत कात्रज भागात घडला आहे.
याबाबत विश्वनाथ पद्मनाभ पुजारी (वय-57 रा. अमित अस्टोनिया रॉयल, आंबेगाव-नऱ्हे रोड, कात्रज) यांनी गुरुवारी (दि.13) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नमस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील सुनिल शिंदे
(वय-30), सिद्धार्थ राहूल रणपिसे (वय-28 दोघे रा. समता सोसायटी, सहकारनगर, पुणे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कात्रज परिसरात बार रस्टोरंट आहे.
आरोपी शिंदे आणि रणणपिसे कात्रज चौक परिसरातील रस्टोरंट आणि बार चालकांना भेटले.
तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहात. हॉटेलला पार्किंग व्यवस्था नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देणार असल्याची धमकी दिली.
फिर्यादी पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हॉटेल, बारचालकांना धमकावून प्रत्येकी दोन लाख रुपये खंडणी आरोपींनी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्यासह इतर हॉटेल चालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुजारी यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी घेणाऱ्या शिंदे व रणपिसे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पुढील तपास करीत आहेत.