पुणे, दि. १४:-“माझे वडिल स्व. विनायक (आबा) निम्हण हे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या कार्यकाळातच या मतदारसंघात नियोजनबद्ध आणि तत्पर विकासाचे एक पर्व सुरु झाले. अभ्यासपूर्ण मांडणी, लोकसहभागाला प्राधान्य आणि शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा या बळावर त्यांनी एक प्रगत मतदारसंघ आकाराला आणला. आबांचा हा जनसेवेचा वारसाच सिद्धार्थ शिरोळे पुढे चालवीत आहेत म्हणून, त्यांना पाठिंबा देत आहे,” अशी भूमिका सनी निम्हण यांनी जाहीर केली. निम्हण यांच्या पाठिंब्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात शिरोळे यांची ताकद वाढली आहे.
महायुतीच्या कार्यकाळात हा मतदारसंघ भाजपकडे गेला. काळाबरोबर वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुयोग्य विकासाचे आव्हान उभे राहिले. परंतु गेल्या पाच वर्षांत युवा आणि अभ्यासू आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आबांचा जनसेवेचा वारसा हाती धरत मतदारसंघाचा वेगाने विकास घडवला आहे. केंद्र, राज्य आणि महानगरपालिका अशा तीन सत्ता केंद्राचा उत्तम रितीने वापर करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय साकारला आहे, अशा शब्दांत निम्हण यांनी शिरोळेंचे कौतुक केले.
आज विद्यापीठ चौकात सुरु असलेला डबल डेकर पूल, मेट्रो प्रकल्प, स्मार्टसिटी प्रकल्पातून झालेली रस्त्यांची कामे, मुबलक पाणीपुरवठा अशा योजनांतून शिरोळे केवळ शिवाजीनगरच नव्हे तर अग्रेसर शहर घडविण्यात महत्त्वाचे योगदान देत आहेत. येत्या काळात काही नवे, कल्पक प्रकल्पही ते तडीस नेणार आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देत पुढील वाटचालीसाठी निम्हण यांनी मनापासून शुभेच्छाही दिल्या.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ शिरोळे हे काम करत आहेत. त्यांची मांडणी, नियोजन आणि कार्यपद्धती यातून आबांच्या जनसेवेच्या वारशाचे प्रतिबिंब डोकावते. सक्षम, सुरक्षित आणि सशक्त महाराष्ट्रासाठी शिरोळे यांना येथील जनता बहुमताने पुन्हा विधानसभेत पाठवेल, याची मला खात्री आहे, असेही निम्हण म्हणाले.