पुणे,दि.१७:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी शनिवारी (ता.16) एका परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहे.
सर्व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन घेवुन जाण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मतदान केंद्रात अथवा 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे फोटोग्राफी / व्हिडीओग्राफी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र व मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील पदार्थ, प्रतिबंधक वस्तु, आदर्श निवडणूक आचारसंहितेमध्ये नमुद केलेल्या नियमातील तरतुदीनुसार प्रतिबंधित बाबी घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांचे (इमारतीचे) 100 मीटर परिसराचे आतील सर्व व्यवसायिक दुकाने, रेस्टॉरंन्ट, टपऱ्या (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्व आस्थापना बंद ठेवावेत. तसेच सर्व राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्षाशी संबंधीत कोणतीही व्यक्ती ते ज्या विधानसभा मतदार संघाचे मतदार नाहीत, त्या मतदार संघात थांबणेस / वास्तव्य करणेस प्रतिबंध करण्यात आले आहे. या कालावधील बेकायदेशीर जमाव करणे, सार्वजनिक सभा / बैठका घेणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे व पदयात्रा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, हे आदेश सोमवारी (ता.18) सायंकाळी सहा ते बुधवारी (ता.20) या दरम्यान लागू असणार आहेत. हे आदेश उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व मतदार यांना लागू राहील. तर हे आदेश मतदानासाठी नियुक्त केलेले शासकीय अधिकारी / स्टाफ पोलीस यांना लागू राहणार नाहीत. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्यये शिक्षेस पात्र राहील. असे आदेश पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिले आहेत.