पुणे,दि.२६:-पुण्यातील अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस देऊनही कामे सुरूच ठेवणे जमीन मालकांना आता भोवणार आहे. आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अशा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यातील पीएमआरडीएने गहुंजे (ता. मावळ) येथील अनधिकृत बांधकामावर गुन्हा दाखल केला असून.
प्राधिकरणाच्या हद्दीत सुमारे 800 पेक्षा अधिक गावांचा समावेश होतो. गहुंजे (ता. मावळ) भागात अनधिकृत बांधकामप्रकरणी संबंधित बांधकामधारकाला अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. मात्र, त्याचे पालन न केल्याने एका जणावर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला.
गहुंजेतील स.नं. १३८ मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. संबंधित बांधकामधारकांना पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी वेळोवेळी नोटीसद्वारे कळवले होते; पण बांधकामधारकाने पीएमआरडीएच्या नोटीसचे पालन न केल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 कलम 54(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊनच आपली बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. तसे न केल्यास संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने स्पष्ट केले आहे.
गुन्हे दाखल करण्याची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी- पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार आशा होळकर, रवींद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांनी केली.