पुणे,दि.२०:- पुण्यातील काही खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची लूटमार थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे रुग्णालयात दरपत्रक लावणे बंधनकारक केले होते. मात्र महानगरपालिकेच्या या नियमाचे २२ खासगी रुग्णालयांनी उल्लंघन केले आहे.
त्यामुळे पुणे शहरातील तब्बल २२ खासगी रुग्णालये पालिकेच्या रडारवर आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या २२ रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
आरोग्य विभागाच्या तपासणीत या रुग्णालयांनी दरपत्रक न लावणे, तक्रार निवारण कक्षाचा ‘टोल फ्री’ क्रमांक आणि रुग्ण हक्कांची सनद न लावल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालये दरपत्रक लावत नसल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या होत्या.
महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट’च्या नियमांनुसार, खासगी रुग्णालयांनी उपचाराचे दरपत्रक, रुग्ण हक्कांची सनद लावणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या मोहिमेनुसार ८५० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांत १५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा अहवाल हा राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे.