भोसरी दि २४ : – लोखंडी कटरचा शस्त्राचा धाक दाखवून चार जणांनी मिळून तरुणाला लुटले. तसेच त्याला मारहाण करून त्याच्या मालकाच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी पाचच्या सुमारास गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
निखिल मोरे (वय 22), प्रथमेश गायकवाड (वय 21), सौरभ भिसे (वय 23, तिघे रा. शास्त्री चौक, भोसरी), संजय चव्हाण (वय 22, रा. गुळवे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी परवेज सईद सय्यद (वय 21) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी परवेज यांच्या भावाला पकडून ठेवले.
त्यानंतर, फिर्यादी यांना फोन करून बोलावून घेतले. फिर्यादी गुळवे वस्ती येथे गेले असता आरोपींनी त्यांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेत हाताने व लोखंडी कटरने मारहाण केली. फिर्यादी यांचे मालक ही भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी मालकाच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. भोसरी येथील पोसई तलवाडे तपास करीत आहेत.