पुणे दि ०१ : – राजा धनराज गिरजी हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज , रास्तापेठ येथील कर्मचाऱ्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे बिल काढण्यासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारणाऱ्या शहरातील एका नामांकीत महाविद्यालयाच्या वरिष्ठ महिला लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. तिच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निता सतिश गंगावणे (वय ४७) असे लाच स्विकारणाऱ्या महिलेचे नाव आहे. महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गंगावणे या वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत.तर तक्रारदार हे संबंधीत संस्थेमध्ये कर्मचारी आहेत.
तक्रारदार यांनी संबंधीत महिलेकडे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे बिल काढून देण्यासाठी व सेवापुस्तिकेवर लेखापरीक्षकाची सही व शिक्का देण्यासाठी तिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तक्रारदारास लाच देणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी सापळा लावून महिलेस अटक केली. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली, अशी माहिती विभागाचे पोलिस उपअधिक्षक श्रीहरी पाटील यांनी दिलीशासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास सपंर्क क्रमांक १०६४ साधण्याबाबतचे आवाहन श्री . राजेश बनसोडे , पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .