पुणे दि २६ :- शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात… या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील ७५ देशात साजरी करण्यात येते. वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई येथे सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचार मंच, दुबई आणि सत्यशोधक, दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सलग ६ व्या वर्षी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.दुबई येथील
शिवजयंतीसाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख सर आणि शिव-शंभू चरित्र अभ्यासक तसेच पुणे महानगर पालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करुन आणि जिजाऊ वंदना गायनाने झाली. विक्रम भोसले यांनी दिलेली शिव-शंभू गारद याने वातावरण शिव-रोमांचित झाले.प्रमुख वक्ते मा. म. देशमुख सर यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि परिवर्तन” या विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, भारतातील 65 टक्के लोक हे तरुण आहेत. ‘युवकांच्या हातात दगड आणि तलवार देण्यापेक्षा त्यांच्या हातात लेखणी आणि पुस्तके द्या. आजचा तरुण मावळा हा भारताचा खरा खज़ाना आहे आणि हा खजाना दंगली मध्ये नाही तर ग्रंथालयात दिसायला हवा. समाजसेवेपेक्षा आज समाज परिवर्तन गरजेचे आहे’असे सांगितले.या नंतर दुबईकरांनी भारावून जात. म. देशमुख सरांना स्टैंडिंग ओवेशन दिली.सत्यशोधक
विचारपीठावर बोलताना ज्ञानेश्वर मोळक बोलले की, ‘इतिहासातील लढाई ही ढाल आणि तलवारीच्या जीवावर करण्याची होती पण आजची लढाई ही ज्ञानाची, शिक्षणाची आणि लेखणीची आहे. आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे पराक्रमी, विद्वान्, लेखक, वाचक आणि बहुभाषिक व्हावे आणि शिव-शंभू चरित्रातून प्रेरणा घ्यावी. यानंतर मोळक यांनी त्यांच्या शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुळापूर, पुणे येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय शिवशंभूतीर्थ संग्रहालयाची आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत असलेल्या समाजसेवा परिवर्तनाची माहिती दिली.या कार्यक्रमाला खास भारतातून दुबईला शिवजयंती ला उपस्थित असलेले प्रवीणदादा गायकवाड यांनी “अहद ऑस्ट्रेलिया, तहद अमेरिका अवघा मुलुख आपला” हा संदेश युवकांना दिला आणि शिवप्रेमींशी संवाद साधला.प्रमुख पाहुण्यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचा परिसंवाद झाला. याने उपस्थित लोकांची मने जिंकली.यानंतर आपल्या महापुरुषांची ओळख या कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ (सुनंदा सपकाळे), छ. शिवाजी महाराज (रघुनाथ सगळे), महात्मा फुले (विजयसिंह शिंदे) , सावित्रीबाई फुले (योगिता शिरसाठ), राजर्षी शाहू महाराज (मुकुंदराज पाटील) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जयंत रंगारी) यांनी एकपात्री भूमिकेतून महापुरुषांच्या विचारांचा संदेश दिला.यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मानस आवटे याने साकारलेला बालशिवाजी, विरेन मडके याने डॉ आंबेडकर ही भूमिका पार पाडली आणि तनय कोचळे याने माझे आवडते हिरो शिवाजी महाराज यावर आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी संदीप कड यांनी गायलेला तानाजी मालुसरे यांचा पोवाडा उपस्थितांची मने जिंकून गेला. यानिमित्त विविध सामाजिक संदेश देणारी भित्तिपत्रके लावण्यात आली होती. तसेच दुबई येथे वाचन संस्कृती तयार व्हावी यासाठी” जिजाऊ – शिवग्रंथ पेटी आपल्या दारी” या विशेष उपक्रमाची सुरुवात दुबई येथे करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने अमोल कोचळे आणि साईनाथ मांजरे यांनी केले तसेच आभार अभिजीत देशमुख यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामेश्वर कोहकड़े, आशिष जीवने, पंकज आवटे, जयंत रंगारी, अमोल कोचळे, संदीप कड, संतोष सपकाळे, सुनंदा सपकाळे, साईनाथ मांजरे, विक्रम भोसले, अभिजीत देशमुख, निखिल गणूचे, विजयसिंह शिंदे, मनोज चौधरी, अन्वर खान, काशीनाथ तिपाटे, अमोल थिगळे यांनी अथक आणि विशेष परिश्रम घेतले.या दुबई येथे सलग ६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी – संयुक्त अरब अमिराती मधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, रास अल खैमा येथून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.