पुणे, दि. ६ नोव्हेंबर : पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या ऐतिहासिक पर्वती टेकडीवर धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी (६ नोव्हेंबर)
यंदाचा ५१ वा पर्वती दीपोत्सव अतिशय उत्साहात आनंदात आणि प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला. अक्षरशः हजारो दिव्यांनी पर्वती टेकडी उजळून निघाली.
पर्वतीच्या प्रत्येक पायरीवर तसेच श्री देवदेवेश्वर मंदिर आणि अन्य मंदिरांमध्ये देखील आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. त्याकरता महिला वर्गाचा उत्साह अतिशय वाखाणण्यासारखा होता. पहाटेपासूनच आबालवृद्ध भरजरी वस्त्रे परिधान करून डेपोत्सवासाठी उपस्थित होती. पहाटेच्या मंगलमय वातावरणात नगारा वादनाचे सूर कानी पडत होते. असंख्य नागरिक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पणत्या लावत होते. सर्वत्र मंगलमय वातावरण आणि उत्साहाचा आनंद भरभरून वाहत होता.
श्री देव देवेश्वर संस्थानचे विश्वस्त आणि पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पांडुरंग रुक्मिणीची आरती करून तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आकर्षक आकाश कंदीलांच्या रोषणाईत आणि पणत्यांच्या प्रकाशात पर्वतीचे सौंदर्य खुलून दिसत होते.
पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यंदाचे दीपोत्सवाचे हे 51 वे वर्ष आहे. गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेबद्दल पुणेकरांमध्ये मोठा उत्साह असतो.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पर्वतीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले . संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघाला .पुण्यातील विविध तालमी, मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या ५१ व्या दीपोत्सवासाठी डॉ. प्रकाश वैद्य, शशिकांत बापट, सुधाकर घोगरे, राजाभाऊ राऊत, संजय शिंदे, नंदकुमार काकिर्डे, अरविंद देशपांडे, नाना वडके आणि नितीन कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
या सोहळ्याचे प्रमुख संयोजन संतोष (बंडू) सकपाळ, प्रशांत दिवेकर, विकास सावंत, ज्ञानेश्वर शिवले पाटील आणि अॅड. नम्रता पंडित होते .तर संयोजन समितीमध्ये विश्वास लेले, भरत उणेचा, भरत सोलंकी, देवयानी प्रभुणे, संतोष राठोड, राजेंद्र ननावरे, पांडुरंग गराडे, राजेश गोरे आणि पांडुरंग बांदल यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे.
या दीपोत्सवाला काका पवार तालीम, गोकुळ वस्ताद तालीम, शिवरामदादा तालीम, सह्याद्री संकुल वारजे, मामासाहेब मोहोळ कात्रज आणि हनुमान आखाडा यांसारख्या पुण्यातील नामांकित तालमींचे विशेष सहकार्य लाभले.
पर्वती ग्रुप, चाची ग्रुप, माऊली ग्रुप, तळजाई ग्रुप आणि पर्वती दीप-महोत्सव ग्रुप यांच्या वतीने पुणेकरांनी या भव्य आणि नेत्रदीपक सोहळ्यात सहभागी होऊन दीपोत्सवाचा अनुभव घेतला .
धार्मिक सोहळा आणि पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव आहे, असे आयोजकांनी सांगितले.




























