पुणे,दि.०७ : – पुणे शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चैनचोराला पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. हैदर सलीम इराणी (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पुणे शहर व परिसरातील एकूण १० चैनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बजाज पल्सर एनएस दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी महिला आपल्या मुलीसोबत पायी जात असताना दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येत त्यांच्या समोर दुचाकी आडवी लावली. त्यानंतर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपास पथकाने घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींची ओळख पटविण्यात आली.
हैदर सलीम इराणी हा बिदर (कर्नाटक) आणि अनंतपूर (आंध्र प्रदेश) परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तो पुण्यात येऊन रेल्वेने रायपूर येथे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी आणि त्याच्या साथीदाराने विविध ठिकाणी चैनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर एनएस दुचाकी जप्त करण्यात आली. अधिक तपासादरम्यान पर्वती, सहकारनगर, काळेपडळ, वारजे, येरवडा आणि इंदापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अशा एकूण १० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.
























