पुणे, १७ :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सारसबाग येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनातील त्यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवसेनेच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात, बाळासाहेब भवन येथेही डॉ. गोऱ्हे आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी पुण्यात शिवसैनिकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा संकल्प डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांच्या निधनाचा दिवस आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता आणि त्यांच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय लोटला होता, अशी आठवण डॉ. गोऱ्हे यांनी सांगितली. बाळासाहेबांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. अलका टॉकीज परिसरात त्यांच्या अनेक सभा झाल्या. त्यांची भेट झाली की ते पुण्यात काय चालले आहे, याची आवर्जून चौकशी करत आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या आठवणी सांगत, असेही त्या म्हणाल्या.
बाळासाहेबांचा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा विचार शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे नेत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी अयोध्येतील राममंदिराची उभारणी, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न आणि समान नागरी कायद्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” या शिंदे यांच्या आश्वासनानुसार शिवसैनिकांनी विविध भागांत मदत पोहोचवली, असे त्या म्हणाल्या.
पुणे शहरातील संघटनात्मक कामाला गती देण्यासाठी शिवसेनेचे संपर्क नेते उदय सामंत लवकरच पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहरातील काही संघटनात्मक नियुक्त्यांसाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख पूजा रावेकर, सहसंपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, सुधीर कुरुमकर, महेंद्र जोशी, नितीन पवार, मीरा तुपेरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.



























