पुणे, दि. २३ : – पुणे महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते, पदपथ, फ्रंट मार्जिन तसेच सार्वजनिक जागांवरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आज व्यापक अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम, पत्र्याचे शेड, झोपड्या, हातगाड्या, पानपट्ट्या, स्टॉल, काउंटर तसेच अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर व स्टँडी आदींवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
१) कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय :
चिंतामणी नगर, जे.एस.पी.एम. चौक, सातव नगर, हांडेवाडी रोड, श्रीराम चौक, हांडेवाडी चौक तसेच परिसरातील विविध ठिकाणी अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये फ्रंट मार्जिनवरील अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईत एकूण १,४१,७५० चौ.मी. क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
२) वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय :
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खंडोजी बाबा चौक व लॉ कॉलेज रोड येथे बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक ५ आणि अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. यावेळी खंडोजी बाबा चौक परिसरातील सात दुकाने सील करण्यात आली.
३) औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय :
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील फ्रंट मार्जिनवरील अनधिकृत अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
४) विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय :
या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १५ सेंटीमीटरचे कट्टे व २० शेड हटविण्यात आले. तसेच हिराबाग व परिमंडळ कार्यालयाशेजारील चार काउंटर, दोन गॅस सिलेंडर व दोन स्टॉल निष्कासित करण्यात आले.
५) वानवडी क्षेत्रीय कार्यालय :
परिमंडळ कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयामार्फत कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयास संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहिमेसाठी मदत करण्यात आली. या कारवाईत एकूण ६७,५०० चौ.मी. क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
६) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय :
परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत कसबा पेठ व विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहिमेसाठी संपूर्ण दिवसभर आवश्यक मनुष्यबळ व सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले.
७) नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालय :
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे २,४०० चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
८) धनकवडी-कात्रज क्षेत्रीय कार्यालय :
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत शेड व स्टॉलवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
९) छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय :
काँग्रेस भवनसमोर बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ६,५०० चौ.फूट क्षेत्रावरील अनधिकृत पत्र्याच्या शेडवर कारवाई करण्यात आली. तसेच चार लोखंडी काउंटर व एक स्टील काउंटर निष्कासित करण्यात आला. याशिवाय संगमवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त मोहिमेसाठीही छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून बांधकाम विकास विभागामार्फत सहकार्य करण्यात आले.
पुणे शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व सार्वजनिक जागा नागरिकांच्या सुरक्षित आणि सुरळीत वापरासाठी उपलब्ध राहाव्यात, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये तसेच अनधिकृत बांधकामांना आळा बसावा, या उद्देशाने पुणे महानगरपालिकेमार्फत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत राबविण्यात आलेल्या अतिक्रमण निष्कासन मोहिमेत एकूण सुमारे २,११,६५० चौ.मी. क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक जागा व रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी यापुढेही नियमितपणे अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत.



























