पिंपरी-चिंचवड,दि.१४ :- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत आळंदी परिसरातील चैन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी वैभव शरद कदम (वय २०), सचिन जालिंदर कदम (वय ४२) आणि विजय ज्ञानेश्वर कदम (वय ३३, सर्व रा. निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली ४ लाख १५ हजार रुपयांची ३२.८० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच ८ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. पुढील तपासासाठी आरोपींना आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली

































