पुणे,दि.१७:- पुणे शहरातील आपत्ती व्यवस्थापन, नाला सफाई, राडारोडा व्यवस्थापन तसेच संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला विविध विधानसभा मतदारसंघांचे आमदार, महापालिका पदाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नाला सफाईची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. शहरातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपायांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी उपस्थित आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामे व प्रलंबित प्रश्न मांडले. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात कचरा डेपो परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. शहरातील कचरा संकलन क्षमता वाढविणे, व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि नवीन कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विविध पर्यायांचा विचार करण्यात आला.
याशिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, देखभाल आणि वाढत्या गरजेनुसार नवीन स्वच्छतागृहे उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. पुणे शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


































