श्रीगोंदा,दि.१७:- प्रतिनिधी : श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सन 2005 मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल 21 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 227/2005, भारतीय दंड विधान कलम 379 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी सदाशिव बबन कायगुडे (रा. अजनूज, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध उद्घोषणा करण्यात आली होती. मात्र तो दीर्घकाळ फरार होता.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी श्रीगोंदा शहरात आला आहे. त्यानुसार पोहेकॉ. संभाजी शिंदे व पोलीस पथकाला आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पथकाने सापळा रचून शनी चौक, श्रीगोंदा येथून आरोपी सदाशिव बबन कायगुडे यास ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात पोहेकॉ. संभाजी शिंदे, पोना. गहिनीनाथ यादव, पोका. अमोल मरकड, विवेक दळवी, संदीप राऊत, महादेव कोहक आणि मपोका. प्रमिला उबाळे यांचा समावेश होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला चालना मिळाली आहे.

































