पुणे, दि. १९ (जिमाका, वृत्तसेवा) : कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या सहापदरी उड्डाण पुलाच्या सेगमेंटल लाँचिंग कामामुळे या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आल्याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी जारी केले.
कोंढवा ते कात्रज येथे जाणाऱ्या वाहनांनी राजस पुलाऐवजी सेवा रस्त्याचा वापर करावा. राजस पुलावर केवळ कात्रज ते कोंढवा दिशेने एकेरी वाहतूक सुरू राहील. कात्रज तलावाकडून येणाऱ्या वाहनांनी सेवा रस्तमार्गे राजस पुलावरून कोंढव्याकडे जावे. तसेच राजस सोसायटीकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांनी कपिला डेअरी येथे वळून (यु-टर्न) घेऊन पुढे जावे. अत्यावश्यक सेवांतील वाहने वगळता सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भाजीभाकरे यांनी केले आहे.
0000



































