पुणे,दि.१० :- पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार तसेच सहपोलीस आयुक्त व अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनांवर विशेष मोहीम राबविली.पुणे शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण १,४५४ ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी २,१४४ चलन तत्काळ वसूल करण्यात आले असून, रु. १६,१८,४०० (सोळा लाख अठरा हजार चारशे रुपये) इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली. याशिवाय एकूण ५,९२१ चलनांची कारवाई करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेत पुणे शहर वाहतूक विभागातील ३० वाहतूक विभाग आणि ४४ पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते व स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहनचालना करावी.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी ट्रॅफिक हिम्मत जाधव यांनी दिली.












