पुणे,दि.१४ :- हिंजवडी परिसरात जुनी कार खरेदी-विक्रीच्या बहाण्याने एका व्यक्तीची तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पंचरला चौक, हिंजवडी (ता. मुळशी, जि. पुणे) येथे घडली. याप्रकरणी १४ मार्च २०२६ रोजी रात्री १०.२१ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
फिर्यादी संतोष बापुराव लंकेर (वय २६, व्यवसाय – ड्रायव्हर, सध्या वाकडी फाटा, गुलमोहर पार्क-२, वाघोली, पुणे; मूळ गाव – धावेडी, ता. जि. जालना) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी रघुनाथ वसंत देशमुख (वय ४३, रा. तळेगाव दाभाडे, व्यवसाय – गाड्या खरेदी-विक्री एजंट) याने स्वतःला जुनी गाडी खरेदी-विक्रीचा एजंट असल्याचे सांगून फिर्यादीला एर्टिगा कार ६,४०,००० रुपयांना देण्याचे आश्वासन दिले. गाडीची कंडिशन दाखवण्यासाठी तो फिर्यादीला वाकड ब्रिज परिसरात घेऊन गेला व चाचणीसाठी एक फेरी मारली.
यानंतर “पैसे देतो” असे सांगून आरोपी गाडी घेऊन निघून गेला आणि परत आला नाही. त्यानंतर फिर्यादीने वारंवार गाडी किंवा दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपीने टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 316(2) व 316(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेचा पुढील तपास सपोनि पाचाळ करीत आहेत.










