पुणे ग्रामीण, दि.१२ :- जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील मंदिरांमध्ये दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आळेफाटा पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार आळे येथील खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर जुन्नर व आंबेगाव परिसरात मंदिर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.
या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सुनील सुरेश आगिवले (वय २०, रा. कळस बु., ता. अकोले, जि. अहमदनगर) व भीमा भाऊसाहेब भिंगे (वय २६, रा. नांदूर शिंगोटे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल, कटर, हातोडा, रोख रक्कम व चांदीचे पैंजण असा एकूण १.११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आळेफाटा, जुन्नर, मंचर, नारायणगाव, राजगुरूनगर आणि संगमनेर परिसरातील एकूण आठ मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या पथकाने केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.










