पुणे,दि.१५:- पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सॅलिसबरी पार्क परिसरातील दोन प्रसिद्ध बेकऱ्यांवर अस्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मध्ये संयुक्त धडक मोहीम राबविण्यात आली. यावेळी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी सॅलिसबरी पार्क येथील गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरी या दोन व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान या बेकऱ्यांकडून सांडपाणी थेट ड्रेनेज लाईन आणि नाल्यामध्ये सोडले जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महापालिकेच्या पथकाने दोन्ही बेकऱ्यांवर प्रत्येकी २५ हजार रुपये असा एकूण ५० हजार रुपयांचा दंड आकारून तो जागेवरच वसूल केला.
ही कारवाई उपआयुक्त संतोष वारुळे, उपआयुक्त माधव जगताप आणि पालिका सहाय्यक आयुक्त तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोरकर, आरोग्य निरीक्षक अमोल लांडगे, तौसिफ देशपांडे आणि चंद्रवदन गायकवाड यांच्या पथकाने केली.
यापुढेही सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांविरोधात कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला असून नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



























