पुणे,दि.१६:- पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ-७ मध्ये अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि समाजकंटकांविरोधात ‘मिशन क्रॅकडाऊन’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ जुलै रोजी सलग धडक कारवाया कारवाईत ७,९९० रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा आणि २ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर हॉटेल राजरत्न येथे ४,००५ रुपयांचा मद्यसाठा आणि ११,५३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
याशिवाय, यशस्वी हॉटेलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून तीन मटका रायटरांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत १०,८९० रुपये रोख रक्कम, मटका साहित्य, पावती पुस्तके आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास लोहगाव पोलीस ठाणे करत आहे.
परिमंडळ-७ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, परिसरातील अवैध दारू विक्री, मटका, जुगार, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे आणि इतर बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



























