पुणे, दि. ३१ जुलै : – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा, स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
बैठकीत दौऱ्याच्या मार्गावरील रस्त्यांची स्वच्छता, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविणे, नाले व ड्रेनेजची प्रभावी साफसफाई करणे, अनधिकृत होर्डिंग्ज हटविणे आणि अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच दौऱ्यादरम्यान शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी वेळेत आणि समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
या आढावा बैठकीला सभागृह नेते गणेश बिडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे विविध विभागांचे उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



























