पुणे,दि.०३ : पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री बुलेट मोटारसायकलींना फटाका सायलेंसर बसवून मोठा आवाज करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ११ दुचाकीस्वारांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्या ११ बुलेट मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दि. ३१ जुलै रोजी रात्री ११ ते १ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत कोंढवा परिसरातील कडनगर चौक, न्याती चौक, रहेजा व्हिस्टा चौक, उंडी आणि महंमदवाडी परिसरात काही युवक बुलेट व इतर मोटारसायकलींना फटाका सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज करत, धोकादायक पद्धतीने वाहने चालवत होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले भयभीत झाली होती. याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवत ११ बुलेटस्वारांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ बुलेट मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याशिवाय फटाका सायलेंसर तयार करून बसविणाऱ्या तीन गॅरेज चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित गॅरेजमधून मॉडिफाईड सायलेंसर जप्त करण्यात आले असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर बदलांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फटाका सायलेंसरचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या इतर वाहनचालकांचा शोधही सुरू असून, अशा वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर जीवन बेनिवाल, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आण्णासो बाबर, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, सपोफौ/राजस शेख, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, निलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, लक्ष्मण काळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.




























