पुणे : भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून मुंढवा पोलिसांनी हरवलेले विविध कंपन्यांचे १० मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख ९० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सन २०२५ आणि २०२६ दरम्यान मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन CEIR पोर्टलवर नोंदविण्यात आले होते. या प्रकरणांचा तपास करताना पोलीस अंमलदार विनोद साळुंखे यांनी मोबाईलच्या IMEI क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा मागोवा घेतला. त्यानंतर विविध राज्यांतील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून संबंधित मोबाईल हस्तगत करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व १० मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुळे, पोलीस अंमलदार विनोद साळुंखे, रुपेश तोडकर आणि सचिन बोराटे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.




























