पिंपरी चिंचवड, दि.०८:- भविष्यात दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी हिंजवडी फेज-२ येथील इन्फोसिस कंपनीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.
या सरावामध्ये एनएसजीच्या २६ स्पेशल कॉम्पोझिट ग्रुपच्या कमांडोंसह पिंपरी-चिंचवड पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (ATS), दंगल नियंत्रण पथक (RCP), बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS),
वाहतूक विभाग, फोर्स वन, अग्निशमन दल, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, रुग्णवाहिका सेवा तसेच इन्फोसिसचे सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.
मॉक ड्रिलदरम्यान दहशतवादी हल्ल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून तातडीने प्रतिसाद, परिसराची नाकेबंदी, नागरिकांची सुरक्षित सुटका, जखमींना वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि बॉम्ब शोधक पथकाच्या कार्यपद्धतीचा सराव करण्यात आला. अशा प्रकारच्या संयुक्त सरावामुळे विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम होऊन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्परतेने प्रतिसाद देण्याची क्षमता वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




























