पुणे,दि.०८ : – पुणे शहरातील सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी भाडेकरू आणि पीजीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न देणाऱ्या घरमालक व पीजी चालकांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ९१३ घरमालक/पीजी चालकांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परराज्य तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिक येऊन राहतात. शहरातील सोसायट्या, बेड अँड ब्रेकफास्ट, पीजी तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास असतात. मात्र, काही घरमालकांकडून कायदेशीर भाडेकरार करूनही भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्यात येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पोलिसांकडून घरमालकांची तपासणी
या मोहिमेदरम्यान विशेष शाखेतील परिमंडळ १ ते ९ मधील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी संबंधित पोलिस ठाण्यांच्या सहकार्याने घरमालकांची माहिती घेतली. पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील घर, सदनिका, पीजी आदी ठिकाणी राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे देण्यात आली आहे का, याची तपासणी करण्यात आली.
भाडेकरूंची माहिती पोलिसांना न कळविणाऱ्या घरमालकांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता/लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे.
ऑनलाइन भाडेकरू नोंदणीची सुविधा
घरमालकांना भाडेकरूंची माहिती देणे सोपे व्हावे यासाठी पोलिसांनी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. IGR (i-SARITA) प्रणालीमध्ये नागरिकांनी ऑनलाइन भरलेली E-leave & licence ची माहिती CCTNS संगणक प्रणालीद्वारे उपलब्ध होते.
तसेच punepolice.in या पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरील Citizen Portal – Online Services मध्ये लॉगिन करून ‘भाडेकरू/पेईंग गेस्ट माहिती विनंती’ या सुविधेद्वारे घरमालकांना भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात ऑनलाइन कळविता येते.
त्यामुळे घरमालक व पीजी चालकांनी भाडेकरूंची माहिती न चुकता संबंधित पोलिस ठाण्यात किंवा उपलब्ध ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
कोथरूडसह अनेक भागांत कारवाई
पुणे शहरातील कोथरूड, डेक्कन, आंबेगाव, न-हे, चतु:शृंगी, खडकी, लोणी काळभोर, लोणी तसेच इतर भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. सदरची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.
पुणे पोलिसांचा स्पष्ट इशारा : भाडेकरू ठेवा, पण त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार.



























