पुणे,दि.१० :- बदलत्या काळात लोकप्रतिनिधींनी पारंपरिक जनसंपर्कासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहणे आवश्यक आहे. जनतेला २४ तास लोकप्रतिनिधींशी जोडणारी व्यवस्था ही काळाची गरज असून, मोबाईलच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार नोंदविणे, तिच्या निवारणाचा मागोवा घेणे आणि प्रशासनाशी अधिक परिणामकारक संवाद साधणे शक्य करणारी ‘व्हॉट्सॲप बॉट’ ही अभिनव संकल्पना राबविणारे सनी निम्हण हे पुणे शहरातील पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांनी केले.
बोपोडी येथे सनी निम्हण यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर,नगरसेविका सपना छाजेड,आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर नागरिकांसाठी अत्याधुनिक ‘व्हॉट्सॲप बॉट’ सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे नागरिकांना कोणतीही तक्रार किंवा सूचना थेट व्हॉट्सॲपद्वारे नोंदविता येणार असून, त्या तक्रारीवर झालेली कार्यवाही, संबंधित विभागाकडील पाठपुरावा, सद्यस्थिती आणि तक्रार निकाली निघाल्याची माहितीही त्याच माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नसून, “कार्यालय आता नागरिकांच्या मोबाईलमध्ये” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे.
यावेळी बोलताना सनी निम्हण म्हणाले, “निवडणुकीत आम्ही नागरिकांना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून उत्तरदायित्व (Accountability) हीच आमची कार्यपद्धती असेल. नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीचा पारदर्शक पद्धतीने पाठपुरावा करून तिची माहिती संबंधित नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था आम्ही उभारली आहे. दर महिन्याला तक्रारींचा आढावा आणि त्यावरील कार्यवाही नागरिकांसमोर मांडण्याचाही आमचा संकल्प आहे.”
ते पुढे म्हणाले, “नगरसेवकाचे काम केवळ रस्ते, पाणी किंवा गटारांपुरते मर्यादित नसते. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, युवकांसाठी मार्गदर्शन, महिलांसाठी विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करणे हीदेखील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अशाच अनेक सामाजिक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करत आहोत.”
सनी निम्हण यांनी पुढे सांगितले की, खासदार मा. मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्मार्ट औंध-बोपोडी’साठी २२ कलमी कार्यक्रमाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या सहकार्याने परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सनी निम्हण यांच्या कार्याचे कौतुक करताना, “चांगल्या कामाचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम निश्चितच इतर लोकप्रतिनिधींसाठी आदर्श ठरेल,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात सनी निम्हण यांनी कार्यालयाच्या उद्घाटना निमित्ताने नागरिक, सहकारी, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत, नागरिकांचा विश्वास, प्रेम आणि सहकार्य हीच आपल्या कामाची खरी ताकद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास विविध मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमित मुरकुटे यांनी मान्यवरांचे आभार मानले.



























