पुणे,दि.११ :- पुणे शहरातील विविध भागांत हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा माग काढत पुणे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल १४८ मोबाईल फोन शोधून काढले. सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या मदतीने शोध घेण्यात आलेल्या या मोबाईलची अंदाजे किंमत ३१ लाख रुपये असून, ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.
शहरातील विविध ठिकाणी मोबाईल फोन हरवल्याबाबत पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. तक्रारींच्या अनुषंगाने सीईआयआर पोर्टलवरून हरवलेल्या मोबाईलची माहिती तपासण्यात आली. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी १४८ मोबाईल हस्तगत केले.
मोबाईल परत मिळाल्याने अनेक तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले. या कारवाईमुळे हरवलेल्या महागड्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी सीईआयआर पोर्टल किती प्रभावी ठरते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या टीममधील सीईआयआर पोर्टल पाहणारे पोलिस अमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट १ ते ६ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत ही कामगिरी पूर्ण केली.



























