पुणे,दि.१४ :- कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात तब्बल १ वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. संतोष अनंत धुमाळ (वय ४५, रा. पौड रोड, कोथरूड, आणि विपुल उत्तम माजिरे (वय ३०, रा. मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी संतोष धुमाळ याचा पोलिस शोध घेत होते. तो पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार लांडगे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धुले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील कारोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विविध पथकांनी गुलमोहर सोसायटी परिसरात सापळा रचला. संतोष धुमाळ तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत संतोष धुमाळ याने पाहिजे आरोपी विपुल उत्तम माजिरे याच्याबाबत माहिती दिली. विपुल माजिरे हा बालगंधर्व चौक परिसरातील जोशी वडवाले यांच्या दुकानाच्या मागे भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. विपुल माजिरे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोथरूड विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त परिमंडळ-३ डॉ. श्री. सागर कवडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कोथरूड विभाग सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक अनिल माने, पोलिस निरीक्षक सुनील कारोटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धुले तसेच पोलिस अंमलदार लांडगे, पठाण, सोनावणे, दगडे, लोखंडे, पांढरे, शिर्के, डोंगरे आणि जमदाडे यांनी केली.




























