पुणे,दि.१४ :- महापालिका, पोलीसांचे वाहतूक खाते यांनी गणेशखिंड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना तातडीने राबविणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) प्रसारमाध्यमांना सांगितले.
गणेशखिंड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पीएमआरडीए चे पथक, महानगरपालिका अधिकारी आणि पीएमपीएमएल च्या अधिकाऱ्यांसमवेत पुणे विद्यापीठ चौक ते संचेती हॉस्पिटल चौकापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली.
पुणे विद्यापीठ चौकात पीएमआरडीए च्या चालू असलेल्या कामाच्या अनुषंगाने उपलब्ध रस्त्याच्या जागेचा जास्तीत जास्त प्रभावी वापर कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली. झेब्रा क्रॉसिंग पुढे घेणे, आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स आत घेणे, रस्ता व फूटपाथची लेव्हलिंग करून वाहतुकीचा सुरळीत प्रवाह कायम ठेवणे आणि कामानंतर रस्त्यावर व फूटपाथवर राहिलेला राडारोडा तातडीने हटविण्याच्या सूचना संबंधित विभागांना आमदार शिरोळे यांनी दिल्या.
कॉसमॉस बँक व एबीआयएल परिसरातील राऊंडअबाऊटचे सुशोभीकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आरबीआय व मोदीबाग मेट्रो स्थानक परिसरात पीएमआरडीए च्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणचे बॅरिकेड्स आत घेण्याचे निर्देश देण्यात आले.
सिमला ऑफिस चौक ते संचेती चौकादरम्यान होणारी वाहतूक कोंडी अनेकदा ॲग्रिकल्चरल कॉलेजच्या पुलापर्यंत पोहोचते. यावर उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पर्यायी वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा सुचविला असून, संचेती चौकात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिका पथ विभागाला आवश्यक निर्देश देण्यात आले.
रस्त्यातील अनावश्यक गॅप व क्रॉसिंग बंद करून वाहतुकीचा सलग आणि सुरक्षित प्रवाह राखणे, तसेच सिमला ऑफिस चौकाच्या अलीकडील रस्त्याची लेव्हलिंग करणे याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर आमचा भर आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
*बॉडीगेट पोलीस चौकी येथे*
*विकासकामांचे भूमिपूजन*
बॉडीगेट पोलीस चौकी, औंध येथे रस्ता रुंदीकरण तसेच परिसरातील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार शिरोळे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) करण्यात आले.
या रस्ता रुंदीकरणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच या विकासकामांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या प्रसंगी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अधिकारी उपस्थित होते.
आमदार शिरोळे यांनी यावेळी नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. त्या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
*भोसलेनगरातील* *एमएनजीएल कामांचा आढावा*
भोसलेनगर येथे सुरू असलेल्या एमएनजीएलशी संबंधित विकास कामांचा आढावा आमदार शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) अधिकारी आणि पदाधिकाऱ्यां समवेत बैठकीत घेतला.
यावेळी परिसरातील चालू असलेली कामे, नागरिकांना होणारा त्रास, रस्त्यांची झालेली दुरवस्था तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, असे आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
नागरिकांची सुरक्षितता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत एमएनजीएल ची कामे व्हावीत. प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
सर्व विकासकामे आणि उपाययोजना यावर मी सातत्याने लक्ष ठेवीन, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी दिले.



























