पिंपरी-चिंचवड,दि.१५ :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी स्वतंत्र आणि प्रशस्त मुख्यालय उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून, वाकुमाता, ताथवडे परिसरातील सुमारे ५० ऐकर जमीन पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २८ मे २०१८ रोजी झाली असून, प्रत्यक्ष कामकाज १५ ऑगस्ट २०१८ पासून सुरू झाले. मात्र, आयुक्तालयाला स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने गेल्या काही वर्षांपासून पोलिस विभागाचे मुख्यालय व इतर कार्यालये तात्पुरत्या स्वरूपातील जागांवर कार्यरत होती. त्यामुळे प्रशासकीय कामकाज आणि सुरळीतपणे कारभार चालविताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्वतंत्र पोलिस मुख्यालयासाठी जागा मिळविण्याच्या दृष्टीने विविध शासकीय विभागांकडे पाठपुरावा सुरू केला. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वाकुमाता प्रक्षेत्र, ताथवडे येथील जागेपैकी २० हेक्टर जमीन पोलिस मुख्यालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात आले.
यानंतर महसूल व वन विभागाच्या मान्यतेनंतर संबंधित जागा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ताब्यात देण्यात आली. त्यामुळे सुमारे आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वतंत्र पोलिस मुख्यालयाच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.
या प्रस्तावित मुख्यालयात पोलिस उपायुक्त मुख्यालयाचे कार्यालय, पोलिस परेड ग्राउंड, पोलिस भरती मैदान, शस्त्र पथक, मोटार परिवहन विभाग, क्यूआरटी कार्यालय, पोलिस शस्त्रागार, पोलिस दवाखाना, रनिंग ट्रॅक व क्रीडा सरावासाठी मैदान, पोलिस प्रशिक्षण शाळा, वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच विविध प्रशासकीय कार्यालये उभारण्यात येणार आहेत.
स्वतंत्र मुख्यालयामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला प्रशस्त व अद्ययावत पायाभूत सुविधा मिळणार असून, पोलिसांच्या प्रशासकीय कामकाजासोबतच प्रशिक्षण, भरती, क्रीडा आणि निवासाच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
या जागेसाठी पाठपुरावा करणाऱ्या पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे तसेच संबंधित पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. प्रस्तावित पोलिस मुख्यालयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस यंत्रणेला भविष्यातील वाढत्या गरजांनुसार सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.




























