पुणे, दि. १५ : – भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन पुणे महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. पुणे महानगरपालिका भवनाच्या प्रांगणात महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात पुणे महानगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्र राज्यगीताचे गायन करण्यात आले.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सायकल रॅली
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने पुणे मनपा सायकल क्लबच्या सहकार्याने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सायकलस्वार सहभागी झाले.
महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे आणि महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
पुणे महानगरपालिका भवन येथून सुरू झालेली रॅली मॉडर्न कॅफे, जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, पुरम चौक, बाजीराव रस्ता मार्गे शनिवारवाडा येथे पोहोचली. त्यानंतर रॅलीचा पुणे महानगरपालिका भवन येथे समारोप करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या सायकल रॅलीतून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सायकल संस्कृतीचा संदेश देण्यात आला.




























