पिंपरी-चिंचवड,दि.२५ :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट-४ च्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्याचा छडा लावत सहा आरोपींना निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे गांधुजे येथील लोढा सोसायटीमध्ये ऑर्डर देऊन झेपेटी स्टेडियमसमोरून जात असताना अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला रिक्षा आडवी मारली. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादीला रिक्षामध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. आरोपींनी फिर्यादीला मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळील मैदानात नेऊन मारहाण केली व त्यांच्याकडील ९० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून नेली.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपी निष्पन्न करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच संशयित इसमांचे सीडीआर, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेण्यात आली. या तपासातून संशयित आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
त्यानुसार पोलिसांनी १) सुरज शंकर चलवादी (वय २८, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी), २) दीपक दयानंद भंडगे (वय २४, रा. झील चौक, न-हे), ३) अविनाश अरुण वानखेडे (वय २६, रा. झील चौक, न-हे), ४) प्रथमेश उर्फ प्रतिक हरिभाऊ कंक (वय २७, रा. आदईगाव, शिळफाटा, पनवेल), ५) विराज उर्फ सनी युवराज हिरे (वय १९, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी-देहूरोड) आणि ६) ईसाक राज काजापूरम (वय २८, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी-देहूरोड) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडा व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी आरोपींना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार व सहा. पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.




























