मुंबई : क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या ‘मिस कॉल’ (Miss Call) या नव्या मराठी गाण्याचे नुकतेच अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते संगीत अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर मिष्टी भवार यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी या आधी Netflixच्या ‘Sacred Games’ या लोकप्रिय वेबसीरिजसाठी तसेच ‘Monkey Man’ या चित्रपटासाठी काम केले आहे. सध्या ती अभिनेत्री डेझी शाह यांच्यासोबत ‘DGP Kashmir’ या आगामी चित्रपटासाठी काम करत आहे. मिष्टीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फराह खान आणि इतर अनेक नामवंत कोरिओग्राफर्सच्या असिस्टंट म्हणून केली. संजय लीला भन्साळीयांच्या ‘रामलीला’ या चित्रपटातील ‘नगाडा संग ढोल’ आणि ‘लहू मुँह लग गया’ या गाण्यांसाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून केलेले तिचे काम विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
कार्यक्रमासाठी विशेषकरून मिष्टी यांच्या कथ्थक गुरु डॉ. स्मृतीताई तळपदे उपस्थित होत्या. त्यांनीही मिष्टीच्या कलागुणांचे भरभरून कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले. फिल्म कलाकार व डान्स टीचर रामेश्वर पळसकर हे मिष्टी यांना आशीर्वाद देण्यासाठी खासकरून संभाजीनगरहुन आले होते.
नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मिष्टी भवार यांच्यासाठी ‘मिस कॉल’ हे गाणे त्यांच्या कलाप्रवासातील एक नवे पर्व ठरणार आहे. मिष्टी भवार आणि सतीश पाटील यांची जोडी या गाण्यात पाहायला मिळणार असून, गाण्याची संकल्पना, सादरीकरण आणि संगीत यामुळे ‘मिस कॉल’ हे गाणे नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. या गाण्याला मिलिंद मोरे यांनी संगीत दिले असून, लोकप्रिय गायिका कविता राम यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणे स्वरबद्ध केले आहे. गाण्याचे चित्रीकरण सिनेमॅटोग्राफर अजय घाडगे यांनी केले आहे.
अभिनेत्री मानसी नाईक गाण्याविषयी सांगते, “ मी सर्व प्रथम मिष्टी भवार आणि ‘मिस कॉल’ गाण्याच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते. गाण्याची कोरिओग्राफी, गीतरचना तसेच गाण्याच चित्रीकरण अतिशय उत्तम सादरीकरण केल आहे. क्रिएटिव्ह आई प्रॉडक्शन्स हे नावाप्रमाणेच क्रिएटिव्ह गाणी यापुढे ही घेवून येतील यात काही शंका नाही. मिष्टी भवार यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा तसेच माझ्या “बघतोय रिक्षावाला” या गाण्याप्रमाणे मिष्टीचं “मिसकॉल” गाण लवकरचं व्हायरल होवूदेत अशी मी आशा करते.” अभिनेत्री मानसी नाईक यांनी मिष्टी भवारने लवकरच मला कोरिओग्राफ केलेलं आवडेल अशी इच्छा देखील कार्यक्रमात व्यक्त केली.
अभिनेत्री मिष्टी भवार मिसकॉल गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “माझ्या आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी या संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. माझी आई केसर भवार यांनी क्रिएटिव्ह आई प्रोडक्शन हाऊस सुरू केल. मिसकॉल या गाण्याची निर्मिती म्हणजे मला माझ्या आईने दिलेल एक सुंदर बर्थडे गिफ्ट आहे. मी माझ्या आईबाबांची कायम ऋणी असेन की त्यांनी मला मनोरंजन क्षेत्रात स्वतःच स्थान निर्मान करण्याची संधी उपलब्ध करून दिली. माझी आयडॉल अभिनेत्री मानसी नाईक यांच्या हस्ते माझ्या पहिल्याच मिसकॉल गाण्याचा संगीत अनावरण सोहळा पार पडण म्हणजे माझ्यासाठी हे स्वप्नवत आहे. मिसकॉल गाण्याला व क्रिएटिव्ह आई प्रोडक्शन या चॅनेलला प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहू देत. हीच माझी सदिच्छा आहे.”
क्रिएटिव्ह आई प्रोडक्शनच्या निर्मात्या केशर भवार सांगतात,”आमच्या प्रोडक्शनकडे संपूर्ण टीम आहे तर ज्यांना कोणाला काही ad, व्हिडिओ, शॉर्ट फिल्म आदी बनवायचे असतील त्यांनी जरूर संपर्क साधावा. तसेच मिसकॉल गाण्याला भरभरून प्रतिसाद द्यावा.”
‘मिस कॉल’ हे गाणे मिष्टी भवार यांच्या कलात्मक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्यांच्या चाहत्यांसाठी तसेच संगीत आणि मनोरंजनप्रेमींसाठी ही नवी कलाकृती नक्कीच खास ठरणार आहे.



























