पुणे, २६ :- हजरत महंमद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) पुण्यनगरीचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या आयोजनातून बोपोडी येथील राजर्षी शाहू महाराज पक्षी विहार केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, “पिंपळ हा राष्ट्रीय वृक्ष असून पवित्र ग्रंथ आणि पुराणांमध्येही त्याचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. हजरत महंमद पैगंबर साहेबांनी जगाला शांतता, सद्भावना, बंधुत्व आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.”
सामाजिक कार्यकर्ते जुबेर पीरजादे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या आणि भारतीय संविधानाच्या विचारांवर चालत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आगळावेगळा पर्यावरणवादी उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अशा प्रकारचा उपक्रम प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्तेही पिंपळ वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी मानाजी बाग सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष गोविंद निंबाळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत नाईकरे, सागर काळे, शुभम माकर, शुभम ताकवले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अमानभाई, जुबेर पीरजादे, शहाबुद्दीन काजी आणि हैदर भाई सय्यद उपस्थित होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम, निलेश वाघमारे, राजेंद्र शिंदे, संजय गजरमल, उत्तम दिवटे, कल्याणी अष्टगे, आप्पासाहेब वाडेकर, फारुख शेख, सादिक शेख, तौफिक चोरगस्ते, बाळू मोरे, नितीन गायकवाड, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, आरती देठे, सुजाता कांबळे तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन ॲड. ज्ञानेश जावीर यांनी केले.




























