पिंपरी-चिंचवड,दि.२६ :- शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. परिमंडळ-१ अंतर्गत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १९ टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
यामध्ये निगडी पोलिस ठाणे हद्दीत ३, चिंचवड २, संत तुकारामनगर ६, दापोडी ३ आणि सांगवी पोलिस ठाणे हद्दीत ५ टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलिस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



























