पुणे,दि.२४ : – अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरातील प्रमुख विसर्जन घाट, कृत्रिम विसर्जन हौद आणि लोखंडी टाक्यांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दल, जीवरक्षक, आपत्ती व्यवस्थापन, विद्युत, आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
नदीकाठच्या विसर्जन घाटांवर दुरुस्ती, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, कचरा वाहतूक, स्वच्छता आणि कीटकनाशक फवारणीची कामे करण्यात आली आहेत. तसेच मिरवणूक मार्गावरील सार्वजनिक स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत जनित्र आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, सुलभ शौचालये, अतिरिक्त प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक ध्वनिक्षेपक, सीसीटीव्ही सनियंत्रण तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांना विसर्जनादरम्यान कोणतीही अडचण आल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
१५ घाटांवर अग्निशमन दलाचा बंदोबस्त
अग्निशमन विभागाकडून शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर २२ अग्निशमन अधिकारी, १५ फायरमन आणि १२० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमा, ओंकारेश्वर, वृद्धेश्वर, गरवारे कॉलेज, पांचाळेश्वर, अष्टभुजा मंदिर, संगम घाट, विठ्ठल मंदिर, बाप्पू घाट, ठोसर पागा घाट, चिमा उद्यान येरवडा, दत्तवाडी घाट आणि वारजे स्मशानभूमी या ठिकाणी २४ तास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
घाटांवर लाईफ जॅकेट, रिंग आणि दोरखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नदीपात्रात आडवे दोरखंड बांधण्यात येणार असून नागरिकांनी शक्यतो नदीपात्रात न जाता महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनंत चतुर्दशीच्या कालावधीत जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध राहावे यासाठी अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. अग्निशमन विभागाचा नियंत्रण कक्ष १०१ या क्रमांकावर उपलब्ध राहणार आहे.
आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
२५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. विविध विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसविण्यात आली असून त्याचे नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कक्षातून करण्यात येणार आहे.
महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष : ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००
अग्निशमन : १०१ / ०२०-२६४५१७०७
पोलीस : १०० / ११२
ॲम्ब्युलन्स : १०८
४१३० फ्लड लाईट्स, ३९० सीसीटीव्ही कॅमेरे
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील अंदाजे २७७ ठिकाणी ४१३० फ्लड लाईट्स बसविण्यात आले आहेत. तसेच अंदाजे ९४ ठिकाणी ३९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विसर्जन काळात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी पॉवर बॅकअप आणि विद्युत कर्मचाऱ्यांची पथके अहोरात्र तैनात ठेवण्यात येणार आहेत.
अलका टॉकीज चौक, एस.पी. कॉलेज चौक आणि शनिपार चौक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी वॉचटॉवर उभारून प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनावर महापालिकेचा भर
नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी नदी, तलाव किंवा इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम विसर्जन हौद आणि लोखंडी टाक्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
२०२५ मध्ये पुणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ३९ टन शाडू मातीचे संकलन करून पुनर्वापर करण्यात आला होता. तसेच निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मितीचा उपक्रमही राबविण्यात येतो.
गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात एकूण ६ लाख ५४ हजार ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते, तर ९ लाख २३ हजार ३९८ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले होते. यंदाही मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या विविध विभागांनी समन्वयाने तयारी केली आहे.
नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
विसर्जन घाटांवरील विद्युत यंत्रणा, फ्लड लाईट्स, विद्युत खांब यांच्याशी नागरिकांनी अथवा लहान मुलांनी छेडछाड करू नये. नदीपात्रात खोलवर जाणे टाळावे, जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.
“श्री गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा,” असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.



























