पिंपरी-चिंचवड ,दि.२९:-
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या अफगाण नागरिकाचा शोध घेऊन दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) संयुक्त कारवाई केली. DANYAR HUSSAIN (वय 26, रा. अफगाणिस्तान) हा नागरिक शहरात अनधिकृतपणे राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर डिपोर्टेशनची (देशाबाहेर पाठविण्याची) कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या वास्तव्याची पडताळणी करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान परकीय नागरिक नोंदणी विभाग (FRO) व विशेष शाखा-२ यांच्या मदतीने एटीबीने माहिती संकलित केली.
मिळालेल्या माहितीनुसार, DANYAR HUSSAIN हा अफगाणिस्तानचा नागरिक असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती मिळाली. दहशतवाद विरोधी शाखेने गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याच्या वास्तव्याचा शोध घेतला.
त्यानंतर एटीबी व एफआरओच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली. यावेळी DANYAR HUSSAIN हा वाकड परिसरातील पेबल्स अर्बनिया सोसायटी, सिद्धार्थनगर, बापूजी बुवा मंदिराजवळील परिसरात राहत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याची कागदपत्रे तपासली असता तो मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर येथे एम.ए. (इकॉनॉमिक्स) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात विद्यार्थी असल्याचे आढळून आले. मात्र, जानेवारी 2026 पासून तो महाविद्यालयात गैरहजर असल्याची माहिती तपासात समोर आली.
तसेच त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाची पडताळणी केली असता पासपोर्ट क्रमांक P02247316 असून त्याचा व्हिसा 12 जून 2024 ते 26 जून 2027 या कालावधीसाठी असल्याचे आढळले. त्याच्याकडे VL2763959 क्रमांकाचा स्टुडंट व्हिसा असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मात्र, भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेला Residential Permit 23 सप्टेंबर 2026 रोजीपर्यंतच वैध होता. त्यानंतर त्याने मुदतवाढ घेतल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत.
त्यामुळे संबंधित अफगाण नागरिक भारतात अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याला ताब्यात घेऊन डिपोर्टेशनची प्रक्रिया वाकड पोलीस ठाणे आणि एफआरओ, पिंपरी-चिंचवड यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या घरात, बंगल्यात, फ्लॅटमध्ये किंवा हॉटेलमध्ये परदेशी नागरिक वास्तव्यास आल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक आहे. परदेशी नागरिकाबाबत माहिती न दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
आपल्या परिसरात कोणताही परदेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एफआरओ किंवा दहशतवाद विरोधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, परकीय नागरिक नोंदणी विभाग (FRO), विशेष शाखा-२ तसेच दहशतवाद विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.



























