पुणे,दि.१७ :- पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली उपआयुक्त सोमणाथ धनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
पुणे पेठ शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मांजा सोसायटी आणि केशवनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण २४ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे स्टॉल, हातगाड्या, पथारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईदरम्यान हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून २६ काउंटर, ७ लोखंडी टेबल, १ स्टील टेबल, ४ फ्रिज, ३ सिलिंडर, ४ लोखंडी स्टँड, ४ टेंट, टेबल व खुर्च्या मिळून ३३, एक शेड आणि सुमारे १० ट्रक इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या मोहिमेसाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पुणे महानगरपालिका पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर आणि बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक उपआयुक्त कैलास वाळेकर, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, अतिक्रमण निरीक्षक सागर भिमुते यांच्यासह शिवाजीनगर-घोले रोड व हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक सहभागी झाले होते.
महापालिकेच्या वतीने अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढेही सातत्याने आणि नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांनी तसेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.




























