येरवडा, दि. २१: – येरवडा ओपन जेलमधील कैद्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी इनरव्हील क्लब मावळ शक्ती, ई-गुडविल आणि निगडी रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जुन्या हिंदी गीतांची सुरेल मैफल रंगली. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांनी कैद्यांना संगीताचा आनंद लुटण्याची अनोखी संधी मिळाली.
या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट व्हाइस चेअरमन अपर्णा प्रधान, येरवडा ओपन जेलचे अधीक्षक शामकांत शेडगे, अॅड. शार्दुलराव जाधवर (भारतरत्न आयकॉनिक अचिव्हर्स २०२६), वरिष्ठ जेलर नागेश कांबळे, पीडीसी मुक्ती पानसे, गायक सुमित कर्णिक, गायिका मुग्धा भट ढोले, प्रतिमा द्रविड आणि भरत नाना राजिवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लतादीदींच्या लोकप्रिय जुन्या गीतांनी करण्यात आली. त्यानंतर मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गीतांनी वातावरण संगीतमय झाले. या सुरेल गीतांचा कैद्यांनी मनमुराद आनंद घेतला. विशेष म्हणजे कैद्यांनीही स्वतः गाणी सादर करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीडीसी मुक्ती पानसे यांनी केले. इनरव्हील क्लब निगडी रॉयल्सच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी चिनप्पा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर आयडब्ल्यू ई-गुडविलच्या अध्यक्षा श्रुती क्षीरसागर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.
यावेळी मावळ शक्तीच्या सेक्रेटरी सुरैय्या शेख, एडिटर छाया साळुंखे, एक्झिक्युटिव्ह मेंबर सरला गचपणे तसेच पोलीस बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी इनरव्हील क्लब मावळ शक्तीच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी सर्व प्रमुख मान्यवर, आयोजक आणि उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले. अल्पोपहाराने या सुरेल आणि आनंददायी कार्यक्रमाची सांगता झाली.
कैद्यांच्या मानसिक आनंदासाठी आणि सकारात्म
वातावरण निर्मितीसाठी आयोजित करण्यात आलेला हा संगीत उपक्रम उपस्थितांच्या मनात समाधान आणि आनंद निर्माण करणारा ठरला.




























