पुणे,दि.०६:-पुण्यात ब्रॅन्डेड कंपनींचे बनावट कपडे विक्री करणार्या दुकानांवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने कारवाई करुन ३५ लाख ३१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन दुकानातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कंपनीचे प्रतिनिधी महेश विष्णु कांबळे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पोमा जितेंद्र शर्मा (वय ४१, रा. ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी), मॅनेजर सोनु राम लोकनदान (वय २६), मोनिश लिलाराम अकतराय अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोरेगाव पार्कमधील इनक्लॉथ स्टोअर्स आणि डिनोव्हा क्लॉथ येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश कांबळे यांच्या कंपनीकडे लॅकोस्टे, अंडरआर्मर,पोलो, गँट, नायके या कंपनीचे स्वामित्व हक्क व कॉपीराईट हक्क आहेत. कोरेगाव पार्कमधील दुकानात या ब्रॅन्डेड कंपन्यांच्या मालाचे बनावट कपडे व इतर वस्तूची विक्री केली जात असल्याची माहिती फिर्यादींना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने कोरेगाव पार्क येथील नार्थ रोडवरील इनक्लॉथ स्टोअर्स व मेन रोडवरील डिनोव्हा क्लॉथ स्टोअर्समध्ये लॅकोस्टे, अंडरआर्मर, पोलो, गँट, नायके या ब्रॉन्डेड कंपनीचे रजिस्ट्रेशन असलेले कंपनीचे बनावट लेबल व लोगोचा वापर करुन हुबेहुब दिसणारे बनावट कपडे व इतर वस्तूंची विक्री केली जात होती. पोलिसांनी या दोन्ही दुकानामधून बनावट टि शर्ट, हुडी, शर्ट, बॅग, अंडरवेअर, स्वॉक्स असा ३५ लाख ३१ हजार ५१ रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कॉपीराईट अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ,पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे, गणेश थोरात, हनुमंत कांबळे, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, निखिल जाधव, नागनाथ राख या पथकाने केली आहे